देवस्थाने
हनुमान मंदिर:
        महाराष्ट्रातील नवलेवाडी हे १९८३ पर्यंत असे एकमेव गांव असावे की ज्या गांवात हनुमान मंदिर नव्हते. गांवाच्या चावडीचे रुपांतर मंदिरात करुन १९८३ साली हनुमान मंदिराची उभारणी होऊन मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. नवलेवाडीत हनुमान मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या काळात प्रसार माध्यमांनी ‘नवलेवाडीत नवलाई’ अशा ठळक बातम्या छापून आश्चर्य व्यक्त केले होते. कारण १००% कम्युनिस्ट चळवळीशी बांधील गांवात आता हनुमान प्रवेश झाला होता.
ह्या वर्षी हनुमान मंदिर नव्याने बांधुन मंदिराच्या समोर ‘क’ वर्ग तिर्थक्षेत्र विकासा अंतर्गत सभागृह बांधुन ह्या मंदिरात हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आता मात्र हे मंदिर व परिसर एक तिर्थक्षेत्र बनले आहे.
गणेश मंदिर:
        नवलेवाडी गावाचा विस्तार झाला, ह्या विस्तारानुसार व्यापारी, मध्यमवर्गीय व इतर व्यवसायातील नागरीक मोठ्या संख्येने ह्या गांवाचे नागरीक झाले. वाढत्या विस्तारीत गांवच्या जनभावनेचे प्रतिक म्हणुन गांवातील अमृतनगर परिसरात नागरीकांना लोकवर्गणीतून मंदिर बांधून हे मंदिर ह्या भागातील नागरीकांचे श्रद्धास्थान ठरले आहे.
श्री रामगिरी महाराज:
        महर्षि अगस्ति ॠषी उत्तरेकडून आले व प्रवरा नदीकाठावर आश्रम स्थापन करुन विसावले. दंडकारण्यातील अगस्ति ॠषींचा आश्रम पुराण-रामायण काळातील महत्वपूर्ण स्थान असून, अगस्ति ॠषींची समाधी येथेच आहे. अगस्ति ॠषींच्या वास्तव्याच्या काळात त्यांचे अनेक शिष्य त्यांच्या आश्रमाच्या आसपास स्वत: उभारलेल्या पर्णकुटीत तपश्चर्या करीत असे. अगस्ति ॠषींच्या ह्या शिष्यगणांच्यापैकी एक शिष्य श्री रामगिरी महाराज हे ऒढ्याच्या काठावर तपश्चर्या करीत असे. त्यांच्या तपश्चर्येच्या जागेवर असलेले हे मंदिर. श्री रामगिरी महाराजांना गोसावी-बाबा म्हणूनही संबोधले जात असत.
शंकर मंदिर:
        नवलेवाडी गांवाचे पश्चिमेस १॥ किमी अंतरावर दोन ओढ्यांच्या मध्यभागातील शिवारात शंकराचे स्थान आहे. नागरिकांनी ह्या स्थानाला आपल्या भावनेतुन आकार देवून हे शंकराचे मंदिर उभारले आहे.
बुद्धगीर बाबा मंदिर:
        नवलेवाडी गांवाचे पूर्वेला बुद्धगीर बाबा मंदिर आहे. नागरीक फार श्रद्धेने ह्या मंदिरातील महादेवाच्या पिंडीची पुजा करतात. अनुमान असे आहे की, बुद्धगीर नांवाचे गोसावी इथे पुजा करीत व भिक्षुक म्हणुन ह्या भागात वावरत आणि ह्या मंदिराला बुदगीर बाबा मंदिर नावाने संबोधले जाते.
|
|