नवलेवाडीचा इतिहास
        खंडप्राय भारत वर्षात आदमासे सात लाख खेडी आहेत. महात्मा गांधी तर भारत हा खेड्यांचाच देश आहे असे मानत. देशातील प्रत्येक गावाला इतिहास असेलच असे नाही, भूगोल मात्र नित्याचाच! परंतु ज्यांचा भूगोल आणी इतिहास वैभवशाली आहे, परंपरेची धारा भूतकाळातुन वर्तमान काळात अथकपणे प्रवाहित आहे अशा मोजक्याच गावांमध्ये अग्रणी असणारे गाव म्हणजे ‘नवलेवाडी’ होय.
कोल्हार-घोटी रस्त्यावर गर्द वडांच्या सावलीला कुशीत घेऊन वसलेले निर्मळग्राम!         फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. छ्त्रपती शिवाजी राजांच्या मावळ ऊर्फ शिवनेर प्रांतातील उस्थळ गांव होत, नव्हे आजही आहे. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी कुकडेश्वराच्या जवळ मावळांतल हे गांव. शिवाजी राजांनी बालवयात मावळ प्रांतातुन आपले सवंगडी मिळवले. अशा ऎतिहासिक आशय असलेल्या उस्थळ या गावातुन १८ व्या शतकात नवले आडनांवाच एक दांपत्य आपले गांव सोडुन दंडक अरण्यातील प्रवरा नदीच्या काठावरील अगस्ति ॠषींच्या पायथ्याशी वसलेल्या अकोले नगरीत स्थायिक झाले, शेती व्यवसायात अडकले. अकोल्याच्या पश्चिमेला मैलभर अंतरावरील काळ्या आईच्या सेवेत रुजू झालं. कष्टाने आणि मेहनतीने ह्या दांपत्याने आपला प्रपंच उभा केला. त्यांची वंशवेल वाढली, बहरली आणि फळास आली, ह्या वंशवेलीने आकार घेतला, अस्तित्व निर्माण केले, त्याच अस्तित्वाच नांव ‘नवलेवाडी’ म्हणून घोषित झालं.
        नवलेवाडी गांव, तीन वाडे; वाडे कसले ते तीन जुनी-पुराणी घरं. ह्या तीन घरातच मुळ नवले दांपत्यांची तीन मुले विभक्त होऊन राहू लागली. तिनाचे नऊ झाले, नवाचे नव्ह्यान्नव झाले. शेतीभाती पिकवू लागले. पुढे नात्यातले इतर कुटुंब जोडली गेली. गांव विस्तारले, वाढले. आजतर नवलेवाडी गावाची लोकसंख्या ३००० च्या वर गेली आहे. आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे आता नवलेवाडी गांव कुणा एका आंडनावाची ओळख उरली नाही. सर्व जाती-धर्माची व वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्या घटकांची तसेच वेगवेगळी जीवनशैली स्विकारुन गुण्या-गोविंदाने नांदणार्या समुहाची अजिंक्य वसुमती झाली.
        नवले आंडनावाची नवलाई मात्र नवलेवाडीने आजवर जपली आहे. ह्या नवलाईचे स्वरुप ओजस्वी इतिहासात, व्रजमुठी एकोप्यात, सुसंवादाच्या तालात तर समृध्दीच्या सामर्थ्यात आजही दडले आहे. १९१९ च्या दरम्यानचा काळ आहे, इंग्रजी सत्तेतला मुजोर मामलेदार अकोले तहसिलला काम करत होता. हिंदूचे मंदिरातील साधुंना दंडलीने मांसाहार करायला लावे; न्याय देताना मुजोर प्रवृत्तीतुन माणसांची छळवणुक करणे, जाती-धर्मात ताण तणाव निर्माण करणे ही ह्या सैतानाची मनोविकृती होती. ह्या छळाला, अन्यायाला कंटाळुन चाळिसगांव डांगानासह अकोले तालुका उठला, मामलेदारावर चाल करुन गेला. सैतान पळाला, वाड्याला लपला, वाड्यात घुसुन ह्या मामलेदाराची जनतेने खांडोळी केली; मामलेदाररुपी रावणाचा वध केला.मनुष्यवधाच्या खटल्यात इंग्रजांनी काही थोडक्या व्यक्तींना अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा दिली. ही काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारी माणसं नवलेवाडी ह्या अजिंक्य वसुमतीची लेकरं होती. परसू व नरसू हे दोन भावंड अंदमानात शिक्षेवर गेली. तर परभू बाबाजी नवले यांनीही अंदमानाची काळ्या पाण्याची शिक्षा भोगली.
अन्याया विरुद्ध लढ्याचे रणशिंगच नवलेवाडी ग्रामस्थांनी फुंकले होते. गावाची प्रतिमा समाजमनामधे लढाऊ गांव अशी ठसली होती. ज्या सामाजिक समस्या निर्माण होत होत्या त्या समस्या आपल्या आहेत असे मानून गांवकरी समस्यांचे निराकरण करीत होते. ३० सप्टेंबर १९३० ला राज्यभर जंगल सत्याग्रहाचा उठाव झाला. जंगलात राहणारे व जंगलावर उपजिवीका असलेली आदिवासी माणसं या जंगल सत्याग्रहात सहभागी झाली होती. कारण जंगलावरचा आदिवासींचा अधिकार इंग्रज सरकारने संपुष्टात आणला होता. या इंग्रज सरकारच्या कृती विरोधात राज्यभर जंगलच्या सत्याग्रहाची चळवळ झाली. अकोले या आदिवासी तालुक्यात ही चळवळ उभी रहाणे स्वाभाविक होते. अकोले तालुक्यात ह्या चळवळीचे नेतृत्व स्व. रामचंद्र नानाजी उर्फ बुवासाहेब नवले यांनी केले व आदिवासी माणसाला जंगलाचा हक्क संपादीत केला.
        बुवासाहेब नवले यांचे मुळनावं रामचंद्र नानाजी नवले. सात्विक, संयमी आणि सन्यासी प्रवृत्ती असे व्यक्तिमत्व. उंचखडक बु॥. या गावी, प्रवरानदीच्या काठावर अगस्ति ॠषींचे बंधु यांचा मठ आहे. ह्या मठाचे २० व्या शतकाच्या मध्यान्य काळात योगी यशवंत महाराज हे मठाधिपती होते. यशवंत बाबांच्या मठात बाबांचे शिष्य म्हणून वावरणार्या तरुणांच्यामधे बहुसंख्य नवलेवाडीकर होते. रामायण, अगस्ति ऋषी व अगस्ति आश्रम यांचा मोठा प्रभाव त्या काळात नवलेवाडीकरांच्या जनमणावर व जनजीवनावर पडलेला होता. त्या एका पिढीत राम, रामभाऊ, रामचंद्र व रामजी ह्या नावांचे तरुण नागरीक मोठ्या प्रमाणात होते. हे सर्वच राममाळाचे व यशवंत बाबांचे स्वयंसेवक होते. स्व. बुवासाहेब नवले हे तर यशवंत बाबांचे पट्टीभाष्य होते. अध्यात्माचे तुफान बुवासाहेब नवले यांच्या मनावर कायमच घोंगावत राहीले. मांसाहार न करणे, चामड्याच्या मोटीचे पाणी न पिणे, स्वत: स्वत:साठी विहिरीवरुन पाणी ओढुन आणने इ. पथ्य बुवासाहेब नवले स्वयंशिस्तीने पाळीत होते. म्हणुन तर रामचंद्र नानाजीचा बुवासाहेब कधी झाला हे त्यांना कळलेच नाही. पुढे तर ह्या बुवासाहेब नवलेंचा अक्षरश: ‘बाबा’ झाला. मागची त्यांची नावे कालबाह्य झाले व ‘बाबा’ ह्या नावाने ते तालुक्याला, जिल्ह्याला व महाराष्ट्राला परिचित झाले. हे फक्त बाबांच्याच संदर्भात झाले असे नाही तर नवलेवाडीतील त्या तमाम पिढीवर यशवंत बबांची जादू झाली; राममाळ सोडायला हे तरुण तयार नव्हते. विवाह बंधनात अडकले तरी घर-पत्नी-संसार ह्या पाशात हे अडकायला तयार नव्हते. एका प्रसंगात तर नवलेवाडीतील ह्या तरुणांच्या घरधनीनींनी सर्व महिलांनी राममाळावर यशवंत बाबांकडे अक्षरश: मोर्चा नेला. आमच्या पतीराजांना तुमच्या मठातुन मुक्ती द्या, या मागणीसाठी आंदोलन झालं. ही तरुणांची फौज बाबांनी मुक्त केली. पण तरुणांच्या ह्या पिढीला संसाराच्या बंधात पुर्णपणे अडकुन ठेवायला ना महिलांना ना तत्कालीन कुटुंब व्यवस्थेला यश आले. पारतंत्र्य झुगारुन स्वातंत्र्यासाठीच्या स्वातंत्र्य संग्रामाचे ते सैनिक झाले. महात्मा गांधींच्या हाकेला त्यांनी साद घातली. वैयक्तिक सत्याग्रहापासुन बाबांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य्लढ्याचा हा झंझावात तुफानी वेगाने नवलेवाडीच्या ह्या भूमीत घुमला. स्व. आण्णासाहेब शिंदे, स्व. चंद्रभान आठरे, स्व. भाऊसाहेब थोरात, स्व. पी. जी. भांगरे, मा. कॉ. पी. बी. कडु पाटील व मा. रावसाहेब शिंदे ह्या नेत्यांचे नवलेवाडी हे माहेरघर झाले. स्वातंत्र्य चळवळींचे मुख्य केंद्र बनले. इंग्रज सरकारला ह्या तरुणांनी जेरीस आणले. गोर्या सैनिकांनी गांवाला वेढा घातला, नव्हे गोर्या सैनिकांच्या छावण्या कायम गावाच्या वेशीला ठाण मांडुन राहिल्या. गोर्यांच्या ह्या दहशतीला न घाबरता स्वातंत्र्याचा लढा ह्या तरुणांनी बुलंद केला. महात्मा गांधीजींनी इंग्रजांना निर्वाणीचा इशारा दिला. ‘भारत छोडो’ चे ऎतिहासिक आंदोलन मुंबईच्या गवालीया टॅकवर झाले. १९४२ च्या ह्या स्वातंत्र्य लढ्यात नवलेवाडी गांव सहभागी झालं. स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात नवलेवाडीने आपल्या सर्वस्वाची आहुती दिली. अपवाद सोडता गांवातील तमाम पुरुषांना इंग्रजांनी जेलमध्ये डांबले. नाशिकच्या प्रिझन कॅम्पमध्ये देशातील मान्यवर स्वातंत्र्य सेनानींच्या बरोबर नवलेवाडी गांवातील तमाम पुरुष मंडळी तुरुंगात गेली. एका छोट्या गावातील एवढ्या संख्येने तुरुंगात गेलेले देशातील हे एकमेव गांव आहे.
        नवलेवाडी हे आता गाव नव्हे स्वातंत्र्य चळवळीचे ठाणे झाले होते. स्वातंत्र्याच्या चळवळीतला सहभाग ह्या गांवाच्या राजकीय भविष्याला एक वेगळे वळण देवू पाहात होता. नाशिक जेलमध्ये तुरुंगात डांबलेले हे स्वातंत्र्य चळवळीचे शिपाई साम्यवादाचे एक नवे गीत गाऊ लागले होते. कॉ. श्रीपाद डांगे व कॉ. आण्णासाहेब शिंदे हे मार्क्सवादाचे धडे तुरुंगातील ह्या स्वातंत्र्य सैनिकांना देत होते. सोवियत रशियासारखाच समाजवादी-साम्यवादी भारताची स्वप्न त्यांना मोहित करीत होती. कॉंग्रेस विचारांच्या पेक्षा वेगळा साम्यवादी विचार त्यांनी स्विकारला होता. नाशिकच्या तुरुंगातुन हे स्वातंत्र्य योद्धे बाहेर पडले तेव्हा त्यांच्या खांद्यावर लाल बावटा व ओठावर मार्क्सवादाचा विचार होता. तर स्फुरलेले बाहु विळा-हातोडा हातात घेवुन नव्या समाजवादी क्रांतीसाठी सज्ज झाले होते.
        १९४५ चा तो काळ होता. देशात अनेक राज्यात दुष्काळी स्थिती होती. शेतकरी उपासमारीचे जीवन जगत होता. अन्नावाचून माणसं मरत होती. इंग्रज सरकार शेतकर्यांना नागवीत होते. महाराष्ट्रात शेतकर्यांचे संघटन करण्याचे विचार कम्युनिष्ट नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या मनात घुमत होते. ठाणे जिल्ह्यात तर शामराव परुळेकर व गोदावरी परुळेकर यांनी वारली शेतकर्यांचे संघटन बांधले गेले. ह्या संघटनेचे नांव ‘किसान सभा’ म्हणुन महाराष्ट्रीयन शेतकर्याला आपले वाटले. किसान सभेचे महाराष्ट्रराज्याचे पहिले अध्यक्ष म्हणुन नेतृत्व करण्याची संधी स्व. कॉ. बुवासाहेब नवले यांना मिळाली. नवलेवाडी गांवचा व गांवातील स्वातंत्र्य चळवळीचा हा सन्मान होता. गांवातील महिला व लेकी-बाळी घराघरात व जात्यावर गीत गाऊ लागल्या, ‘किसान सभा आमची माऊली गं, शेतकर्यांची सावली गं ।’
        अखेर देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यासाठी कुर्बानी दिलेली गावातील स्वातंत्र्य सेनानींची पिढी तिरंग्याला सलाम करत असतानाच कम्युनिस्ट नेत्यांनी हे स्वातंत्र्य खरं स्वातंत्र्य नाही, खर्या स्वातंत्र्याची लढाई परत लढावी लागेल हा नारा दिला. इंग्रजाच्या विरोधात स्वातंत्र्यासाठी लढलेली ही पिढी खर्या स्वातंत्र्यासाठी कॉंग्रेस सरकारच्या विरोधात लढायला सिद्ध झाली.स्व. आण्णासाहेब शिंदे, स्व. चंद्रभान आठरे पाटील, स्व. भाऊसाहेब थोरात, स्व. बुवासाहेब नवले, स्व. मुरलीमास्तर नवले, स्व. पी.जी.भांगरे, स्व. सक्रुभाई मेंगाळ, मा. पी.बी.कडु पाटील, मा.ॲड. रावसाहेब शिंदे या मान्यवरांच्या नेतृत्ताखाली लाल बावट्याचे सैनिक खर्या स्वातंत्र्यासाठी मैदानात उतरले. सशक्त क्रांती पर्यंत चळवळीची व्याप्ती वाढवून भारतात कम्युनिझमच्या माध्यमातुन समाजवादी सत्ता निर्माण करण्याचे स्वप्न डावी चळवळ पाहू लागली. चळवळीची व्याप्ती देशभर पसरली असताना अहमदनगर जिल्ह्याचे चळवळीचे केंद्र नवलेवाडी होते हे विशेष महत्वाचे. क्रांतीचा आशय रक्तरंजीत क्रांतीपर्यंत पोहचतोय हे लक्षात येताच कम्युनिस्ट पक्षावर सरकारने बंदी घातली. कार्यकर्ते जेलमध्ये डांबले जाऊ लागले, नेतेगण भुमिगत झाले. भुमिगत कार्यकर्त्यांच्यामध्ये वर उल्लेख केलेले सर्व नेते होते. ह्या नेत्यांनी भुमिगत राहुन आपल्या विचारांचा प्रसार चालुच ठेवला. आम जनतेने ह्या भुमिगत नेत्यांना आश्रय व आधार दिला. प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही सरकारच्या पोलीस यंत्रणेला त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. जिवावर उदार होऊन क्रांतीच्या संकल्पनेने भारवलेले नेते कथा-कादंबरीतील नायकासारखे आपले भुमिगत जीवन मात्र उन्मादान जगत होते. ह्या भुमिगतांना मदत करण्याचे जोखमीचे काम नवलेवाडी गावातील माता-भगीनींसह सर्वच उत्साहात करत होते. ह्या भारवलेल्या परिस्थितीत नवलेवाडीतील माता-भगिनी पहाटे जात्यावर दळण दळताना लाल बावट्याची समरगीते गात असायच्या-
‘रक्तान गं रंगला बाई लाल बावटा ।’
        ह्या गिताची नवलेवाडीत जणू पारंपारीक ओवी म्हणावी अशी ओळख झाली होती. स्वातंत्र्याची चळवळ असो की कम्युनिस्ट चळवळ असो, नवलेवाडी गावातील वातावरण ‘प्रत्येक घर बने किल्ला’ असे असायचे. हा किल्ला उन्मादाने लढवला जायचा. लढाईवर गेलेला मावळा जसा जीवावर उदार होतो व तळहातावर शिर घेऊन लढतो, तशीच स्वातंत्र्याची व साम्यवादाची लढाई नवलेवाडीने लढली. माता-भगिनींनी घर-प्रपंच आपल्या कर्तृत्वाने सांभाळला. मोटा हाकणे पासुन शेती व्यवसायची धुरा उत्तमपणे सांभाळली. कॉंग्रेस सरकारने गांवाला आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली व जबरीने वसुलही केली. तरीही शेतकरी-कामगारांचे राज्य आणण्याचा हा लढा थांबला नाही. सोवीयत रशियातील समाजसत्तावादी राज्यपद्धतीचा अर्थात साम्यवादाचा हा प्रयोग ह्या गांवात प्रत्यक्ष राबविला गेला. सर्वांच्या सामाहिक मालकीची जमीण घोषीत करण्यात आली व कामाच्या जबाबदार्या निश्चित करण्यात आल्या. मात्र हा प्रयोग प्रत्यक्ष स्वरुपात राबविता आला नाही.
सावकारशाहीच्या विरोधात लढण्याची परंपरा अकोले तालुक्याला नविन नाही. क्रांतीवीर राघोजी भांगरे नंतर कोंड्या नवले यांनी सावकारशाही विरोधी चळवळ बुलंद केली. त्यानंतरच्या काळात ह्या सावकारशाही-विरोधी चळवळीचे रणशिंग नवलेवाडी गांवाने फुंकले, सावकारांच्या वह्या जाळणे व सावकारशाही नष्ट करणे हे सावकारशाही-विरोधी काम तसेच कम्युनिस्ट चळवळीचे काम कॉ. बुवासाहेब नवले, कॉ. मुरलीधर मास्तर नवले व स्व. कुशाबा सिदु नवले याच नेत्यांच्या नेत्तृत्वाखाली झाले.
‘नवलेवाडी’ हा इतिहासाच्या पटलावर विस्ताराने लिहावा असा ऎतिहासिक दस्तऎवज आहे. ह्या गांवाची ही म्हणजे अति-अल्प ओळख आहे.
-श्री. मधुकरराव नवले.
|
|