कै.कॉ.बुवासाहेब नवले.(आमचे प्रेरणास्थान) |
मौजे नवलेवाडीता. अकोले, जि. अहमदनगर
|
कै.कॉ.मुरलीधर(मास्तर) नवले.(आमचे प्रेरणास्थान) |
मौजे नवलेवाडी गावच्या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत. |
        अकोले तालुक्यातील नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यातील सर्व परिचीत गांव म्हणजे 'नवलेवाडी'. जिल्ह्याच्या व तालुक्याच्या इतिहासाला या छोट्याशा गांवाला वगळून पुढे जाता येणार नाही. कथा शौर्याची असेल, विचार सामर्थ्याचा व समृद्धीचा असेल, कृती विधायक परिवर्तनाची असेल, भूमिका गंमत न पाहता झोकून देण्याची असेल, चित्र विकासाचे असेल, वातावरण एकजुटीचे असेल, इतिहास स्वातंत्र्याच्या समराचा असेल आणि चळवळ शेतकरी, कामकर्यांची असेल तर नवलेवाडी या गावाचे नाव घ्यावेच लागेल!!!!!
खंडप्राय भारत वर्षात आदमासे सात लाख खेडी आहेत. महात्मा गांधी तर भारत हा खेड्यांचाच देश आहे असे मानत. देशातील प्रत्येक गावाला इतिहास असेलच असे नाही, भूगोल मात्र नित्याचाच! परंतु ज्यांचा भूगोल आणी इतिहास वैभवशाली आहे, परंपरेची धारा भूतकाळातुन वर्तमान काळात अथकपणे प्रवाहित आहे अशा मोजक्याच गावांमध्ये अग्रणी असणारे गाव म्हणजे ‘नवलेवाडी’ होय.
        कोल्हार-घोटी रस्त्यावर गर्द वडांच्या सावलीला कुशीत घेऊन वसलेले निर्मळग्राम! फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. छ्त्रपती शिवाजी राजांच्या मावळ ऊर्फ शिवनेर प्रांतातील उस्थळ गांव होत, नव्हे आजही आहे. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी कुकडेश्वराच्या जवळ मावळांतल हे गांव. शिवाजी राजांनी बालवयात मावळ प्रांतातुन आपले सवंगडी मिळवले. अशा ऎतिहासिक आशय असलेल्या उस्थळ या गावातुन १८ व्या शतकात नवले आडनांवाच एक दांपत्य आपले गांव सोडुन दंडक अरण्यातील प्रवरा नदीच्या काठावरील अगस्ति ॠषींच्या पायथ्याशी वसलेल्या अकोले नगरीत स्थायिक झाले, शेती व्यवसायात अडकले. अकोल्याच्या पश्चिमेला मैलभर अंतरावरील काळ्या आईच्या सेवेत रुजू झालं. कष्टाने आणि मेहनतीने ह्या दांपत्याने आपला प्रपंच उभा केला. त्यांची वंशवेल वाढली, बहरली आणि फळास आली, ह्या वंशवेलीने आकार घेतला, अस्तित्व निर्माण केले, त्याच अस्तित्वाच नांव ‘नवलेवाडी’ म्हणून घोषित झालं.
        नवलेवाडी गावाबाबत पहिले विशेष हे आहे की, सरकार दरबारी या गावाला गावाचा दर्जा, महसुली गाव अशी मान्यता सन १९७६ च्या दरम्यान मिळाली. मात्र हे गांव गावाच्या पारंपारिक रीतीरीवाजाने सन १८७५ पासून नांदत आले आहे. शतकाहुन अधिक वर्षांपासून गुण्या-गोविंदाने गोकुळासारखे नांदलेले हे नवलेवाडी गांव! सुरुवातीला नवलेवाडी गांव अकोले ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट होते, पुढे दि. ०७/०७/१९९३ रोजी स्वतंत्रपणे ग्रामपंचायत नवलेवाडीला मान्यता मिळाली आणि एकापाठोपाठ एक असे अनेक पुरस्कार ग्रामपंचायत नवलेवाडीने पटकाविले.
|
|